वन विभागाची सतर्कता : गोरक्षनाथ गुहा परिसरातील मोठी वनसंपत्ती बचावली
खुलताबाद, (प्रतिनिधी): तालुक्यातील म्हैसमाळ व पिंपरी डोंगरालगत असलेल्या गोरक्षनाथ गुहा परिसरात शनिवारी (दि. २५) दुपारी भीषण वनाग्नी लागला. वन विभाग आणि स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत तब्बल साडे नऊ तासांच्या अथक परिश्रमानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवले. वन विभागाच्या या तत्परतेमुळे परिसरातील मोठी वनसंपत्ती जळून खाक होण्यापासून वाचली आहे.
घटने बाबत अधिक माहिती अशी कि, कीशनिवारी दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास डोंगराळ भागात आग लागल्याची माहिती वन विभागाला मिळाली. उन्हाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले होते. रात्रीच्या अंधारातही डोंगरदऱ्यात वन कर्मचाऱ्यांनी आगीशी झुंज दिली. अखेर रात्री १.३० वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.
यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख व वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख, वन परिमंडळ अधिकारी संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मयूर चौधरी (पळसवाडी), सुनील कडपे (गोळेगाव), पुरुषोत्तम वायाळ (म्हैसमाळ) व वनमजूर इस्माईल शहा यांनी थेट आगीच्या ठिकाणी धाव घेतली. त्यांना म्हैसमाळ संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी अरुण रगडे, दीपक साथदिवे, अविनाश बनकर, करण बोहरे व शरद मोटे असे वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे ९ कर्मचारी सहभागी होते. वन परिमंडळ अधिकारी संदीप मोरे यांनी तातडीने पथके तैनात केली.
-- नागरिकांना केले आवाहन --
उन्हाळ्यात पालापाचोळा वाळलेला असल्याने छोटीशी ठिणगीही मोठ्या वणव्याला कारणीभूत ठरू शकते. पर्यटकांनी किंवा स्थानिकांनी वनक्षेत्रात आग लागेल असे कृत्य करू नये. कुठेही धूर किंवा आग दिसल्यास तत्काळ वन विभागाला सूचित करावे, असे आवाहन वन विभाग खुलताबादच्या वतीने केले आहे.












